बारामती : प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठान संस्थेनं दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीत उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मिडियम स्कूलच्या नवीन इमारतीचं उदघाटन उद्या रविवार दि. २२ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक संकुलांची उभारणी करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे अनंतराव पवार इंग्लिश मिडियम स्कूलची भव्य इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचा उदघाटन व नामकरण समारंभ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते रविवार दि. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबातील सदस्यही उपस्थित राहणार आहेत. राज्यातील राजकीय घडामोडीनंतर प्रथमच पवार कुटुंबातील हे तीनही नेते या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर येत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.