
बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या शनिवार दि. २३ सप्टेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. तर दिवसभरात तब्बल तेरा कार्यक्रमांना अजितदादा उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभाही उद्या संपन्न होणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी ८ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्यरुग्ण (अपघात) विभागाच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी ९ वाजता सहयोग सहकारी गृहरचना संस्थेच्या वार्षिक सभेस उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी १० वाजता जिजाऊ भवन येथे बारामती सहकारी बँकेची वार्षिक सभा, दुपारी १२ वाजता डेंगळे गार्डन येथे बारामती तालुका खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा, दुपारी २ वाजता बारामती तालुका दूध संघाची वार्षिक सभा आणि दुपारी ३-३० वाजता रयत भवन येथे कृषि उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
दुपारी ४-३० वाजता आझाद तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीस ११ किलो चांदीचे दागिने अर्पण कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५-३० वाजता भिगवण रस्त्यावरील ढोणे मोटो या इलेक्ट्रिक दुचाकीच्या शोरूमचं उदघाटन, त्यानंतर सियारा फर्टीलिटीचे उदघाटन अजितदादांच्या हस्ते होईल. सायंकाळी ६ वाजता सातव चौकात के मार्ट मॉलच्या उदघाटन कार्यक्रमानंतर धों. आ. सातव कारभारी हायस्कूल येथे श्री काशीविश्वेश्वर तरुण मंडळाने आयोजित केलेल्या कसबा गणेश महोत्सवाचे उदघाटन होणार आहे.
सायंकाळी ७ वाजता मोरोपंत सभागृहात अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळाच्या श्रीमंत आबा गणपती महोत्सवाचे उदघाटन आणि त्यानंतर सायंकाळी ७-३० वाजता नटराज नाट्य कला मंडळाच्या बारामती गणेश फेस्टिव्हल उदघाटन कार्यक्रमास अजितदादा उपस्थित राहणार आहेत.