बारामती : प्रतिनिधी
अनोळखी ठिकाणी एखादं संकट आलं तर मदत मिळेलच याबाबत शाश्वती नसते. अनेकदा वेळेत मदत न मिळाल्यामुळे अनर्थ घडल्याच्या घटना आपण पाहत असतो. मात्र आज बारामती तालुक्यातील पाहुणेवाडीत झालेल्या अपघातानंतर ‘आम्ही सेवेठायी तत्पर’ ही म्हण खरी ठरल्याचं पाहायला मिळालं. तातडीची उपचार सुविधा, पाहुणेवाडी ग्रामस्थांची दक्षता आणि उपचारादरम्यान राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता यामुळे सर्वच जखमींना वेळेत उपचार मिळाले. सोबतच मिळालेल्या आपुलकीनं या विद्यार्थीनी आणि त्यांचे शिक्षकही भारावून गेले.
शिर्डीहून इचलकरंजीकडे जाणाऱ्या बसचा आज पहाटे बारामतीनजीक पाहुणेवाडीत अपघात झाला. यात जवळपास २८ विद्यार्थीनी जखमी झाल्या होत्या. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात बसमध्ये विद्यार्थीनी अडकून बसल्या होत्या. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना बाहेर काढत बारामतीतील शासकीय महिला रुग्णालयात दाखल केले. अपघाताबाबत माहिती मिळाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तातडीने उपचार सुविधा देण्याच्या सूचना देत उपचारात कोणतीही कमतरता भासू नये याबाबत निर्देश दिले.
दुसरीकडे, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अविनाश बांदल, सोशल मीडिया शहराध्यक्ष तुषार लोखंडे, अमित तावरे, विजय गावडे, अभिजीत घाडगे, चंदू लोंढे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शासकीय महिला रुग्णालयात धाव घेतली. अपघातामुळे बसमधील विद्यार्थिनींसह शिक्षक आणि कर्मचारीही घाबरून गेले होते. ही बाब लक्षात घेत उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना धीर देत त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून दिला.
दरम्यानच्या काळात खासदार सुप्रिया सुळे यांनी या अपघाताची माहिती घेत नाश्ता, जेवणासह सर्व त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. या दरम्यान, आमदार रोहीत पवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थिनींची भेट घेत त्यांना धीर दिला. उपचारासाठी कसलीच कमतरता भासू नये यासाठी संबंधित डॉक्टरांशी चर्चा केली. शासकीय महिला रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही या विद्यार्थिनींना तातडीने उपचार उपलब्ध करून देत आधार दिला.
किरकोळ जखमी असलेल्या विद्यार्थिनींना प्राथमिक उपचारानंतर बारामती आगारातून बोलवण्यात आलेल्या शिवशाही बसमधून इचलकरंजीकडे रवाना करण्यात आले. यावेळी या सर्वच विद्यार्थिनींची गुलाब पुष्प आणि पानी व फळे देत पाठवणी करण्यात आली. अपघातग्रस्त बसमधून बाहेर काढण्यापासून उपचारानंतर पुन्हा इचलकरंजीकडे पाठवेपर्यंत पोलिस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या विद्यार्थिनींना दिलेला आधार सर्वांनाच भारावून टाकणारा ठरला.