बारामती : प्रतिनिधी
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे रविवार दि. १३ नोव्हेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान सकाळी ६ वाजल्यापासून ते विकासकामांची पाहणी करणार आहेत. तसेच ९ वाजता बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात अजितदादांचा जनता दरबार होणार आहे. त्यानंतर ते बारामती तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत.
अजितदादा उद्या रविवारी बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून ते बारामतीतील विविध विकासकामांची पाहणी करणार आहेत. तर सकाळी ९ वाजता विद्या प्रतिष्ठानमध्ये होणाऱ्या जनता दरबारात अजितदादा नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. दुपारी १२ नंतर कऱ्हावागज, जळगाव सुपे, फोंडवाडा, बाबुर्डी, तरडोली आणि आंबी येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बंधाऱ्यांची पाहणी करून आढावा घेणार आहेत.
दिवाळीनंतर तब्बल दोन आठवड्यानंतर अजितदादा बारामतीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर बारामतीत जनता दरबारही होणार आहे. गेली अनेक वर्षे अजितदादा बारामतीत जनता दरबार घेत असतात. यामध्ये नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढला जातो. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देऊन नागरिकांचे प्रश्न सोडवले जातात. त्यामुळे जनता दरबारासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात.