बारामती : प्रतिनिधी
बारामतीतून जाणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर बेकायदेशीरपणे मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी या महामार्गाचे कंत्राटदार शेळके कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांना ४ कोटी ११ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी हा दंड ठोठावला असून सात दिवसात हा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बारामतीतील सामाजिक कार्यकर्ते मंगलदास निकाळजे यांनी याबाबत तक्रार दिली होती. सध्या बारामती तालुक्यात संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरु आहे. शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरु आहे. या कामादरम्यान उंडवडी सुपे येथे कोणत्याही परवानगीशिवाय मुरूम उत्खनन केल्याचे आढळले होते. तब्बल ८०७६ ब्रास मुरूम बेकायदेशीरपणे काढण्यात आल्याची तक्रार मंगलदास निकाळजे यांनी दिली होती.
मंगलदास निकाळजे यांनी पाठपुरावा केल्यानंतर बारामती महसूल प्रशासनाने या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करत पंचनामा केला होता. त्याबाबत शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला नोटीसही बजावण्यात आली होती. परंतु संबंधित कंपनीने कोणताही खुलासा सादर केला नाही.
कोणत्याही परवानगीशिवाय मुरूम उत्खनन केल्यामुळे तहसीलदार विजय पाटील यांनी शेळके कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीला ४ कोटी ११ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.सात दिवसांच्या आत हा दंड भरण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात मंगलदास निकाळजे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. शासकीय कामाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी आता निकाळजे यांनी केली आहे.