बारामती : प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बारामती येथील सहयोग सोसायटीतील निवासस्थानी कोणत्याही परवानगीशिवाय आंदोलन करणाऱ्या २८ जणांवर बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व आंदोलकांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी दिली.
छत्रपती संभाजीमहाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर अधिवेशनादरम्यान म्हटलं होतं. यावरुन आता भाजप आणि शिंदे गटाने राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. आज बारामतीतही भाजपच्या वतीने आंदोलन केले जाणार होते. मात्र तत्पूर्वीच भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानासमोर आंदोलन केले.
या ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी २८ जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार कल्याण खांडेकर यांनी फिर्याद दिली आहे.
बारामती शहर पोलिसांनी दिपक सिताराम काटे (रा. सराटी ता. इंदापुर), मच्छींद्र शंकर टिंगरे (रा. झारगडवाडी ता. बारामती), अभिषेक आण्णासाहेब कोळेकर (रा. तरंगवाडी, ता. इंदापुर), अक्षय चंद्रकांत चव्हाण (रा. भिगवण रोड बारामती), ओंकार किशोर बनकर (रा. लाटे ता. बारामती), दादासो रामचंद्र बरकडे (रा. कटफळ ता. बारामती), ओंकार संजय फडतरे (रा. सणसर ता. इंदापुर) अमर सुनिल दळवी (रा. भवानी नगर ता. इंदापुर), अक्षय कल्याण गुलदड (रा. पाटेगाव ता. कर्जत), रोहित गोविंद इचके (रा. कर्जत ता. कर्जत) गणेश भिमराव पडळकर (रा. अकोले ता. इंदापुर), सागर जालींदर पवार (रा. बेलवाडी ता. इंदापुर), स्वप्नील कैलास जोगदंड (रा. कर्जत ता. कर्जत), औंदुवर अशोक भंडलकर (रा. भादलवाडी ता. इंदापुर), अक्षय राजेंद्र गायकवाड (रा. कर्जत ता. कर्जत), दत्ता लालासो बोडरे (रा. भालदवाडी ता. इंदापुर), आनंद सोमनाथ शेंडे (रा. निमगाव ता. इंदापुर), युगराज वामन माकर (रा. उंडवडी कप), सुरज विभिषण पासगे (रा. वडापुरी ता. इंदापुर), सागर बाळु मोरे (रा. वरकुटे खुर्द ता. इंदापुर), अनिकेत बाळू भोंग (रा. इंदापुर), संकेत संतोष काळभोर (रा. सणसर ता. इंदापुर), अर्थव रोहित तरटे (रा. कर्जत ता. कर्जत), रोहन प्रकाश शिंदे (रा. कर्जत ता. कर्जत), किरण रविंद्र साळूखे (रा. भवानीनगर ता. इंदापुर), प्रवण रूद्राक्ष गवळी (रा. इंदापुर), वैभव सोमनाथ शिंदे (रा. कर्जत), चंद्रकांत प्रल्हाद खोपडे (रा. तावशी ता. इंदापुर) यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात भा. द.वि. कलम १४३, १४९ तसेच मुंबई पोलिस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.