आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BIG BREAKING : नीरा डावा कालवा अस्तरीकरणाबाबतची बैठक ठरली निष्फळ; शेतकऱ्यांचे दोन गट समोरासमोर आल्याने झाला गोंधळ

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाबाबत बारामतीत आज जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये आयोजित बैठक चर्चेविनाच निष्फळ ठरली. अस्तरीकरणाला विरोध करणारे आणि पाठींबा असणारे शेतकरी समोरासमोर आल्यामुळे या बैठकीत गोंधळ उडाला.

पुणे जिल्हा शेतकरी कृती समिती व कालवा बचाव समितीसह विविध शेतकऱ्यांची आज बारामतीतील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जलसंपदा विभागाचे अधिकारी यासंदर्भातील भूमिका मांडून शेतकऱ्यांची बाजू जाणून घेणार होते. या बैठकीसाठी शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, माळेगावचे संचालक मदनराव देवकाते यांच्यासह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने आले होते.

बैठकीच्या प्रारंभी कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी निरा डावा कालवा अस्तरीकरणासंदर्भात जलसंपदा खात्याची भूमिका मांडली. त्यांनी या संपूर्ण कामाबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी शंका विचारण्यास सुरुवात केली. त्यामध्ये अस्तरीकरणाच्या विरोधात असणारे आणि अस्तरीकरणाला पाठींबा देणारे शेतकरीही होते. त्यामुळे या बैठकीत गोंधळाला सुरुवात झाली. दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांची मते वेगवेगळ्या बैठका घेऊन जाणून घ्यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

एकूणच या सर्व गोंधळात बैठकीत कसलीही चर्चा झाली नाही. दरम्यानच्या काळात बारामती शहर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन परस्परविरोधी विचाराचे शेतकरी असल्याने कोणत्याही परिस्थितीची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याकरता आपण सर्वांनी आपापल्या लोकशाही मार्गाने स्वतंत्र भूमिका मांडावी असे आवाहन केले.

दरम्यान, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीशराव काकडे यांनी यासंदर्भात लवकरच स्वतंत्र बैठक बोलावली जाईल असे जाहीर केले. वास्तविक ज्या शेतकऱ्यांचा अस्तरीकरणाला विरोध आहे, त्यांच्यासाठी ही बैठक होती. मात्र अस्तरीकरणाच्या बाजूच्या शेतकऱ्यांना बोलावले गेल्याने ही बैठक निष्फळ ठरल्याचे काकडे यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच बारामतीत याबाबत स्वतंत्रपणे बैठक घेऊ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us