
बारामती : प्रतिनिधी
शिर्डीहून इचलकरंजीकडे जाणाऱ्या विद्यार्थीनींची बस बारामती तालुक्यातील पाहुणेवाडीतील पूलावरुन कोसळली. या अपघातात २४ विद्यार्थीनी जखमी झाल्या असून तीन विद्यार्थीनी गंभीर आहेत. जखमींवर बारामतीतील शासकीय महिला रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
इचलकरंजी येथील सागर क्लासेसच्या विद्यार्थीनींची औरंगाबाद, शिर्डी येथे शैक्षणिक सहल काढण्यात आली होती. शिर्डीतून या विद्यार्थीनींची बस रात्री इचलकरंजीकडे निघालेली असताना रात्री सव्वातीन वाजण्याच्या सुमारास बारामती तालुक्यातील पाहुणेवाडीतील पूलात ही बस कोसळली.
या अपघातात २४ विद्यार्थीनी जखमी झाल्या आहेत. यातील तीन विद्यार्थीनी गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि माळेगाव पोलिसांनी मदतकार्य पोहोचवत संबंधित विद्यार्थीनींना बारामतीतील शासकीय महिला रुग्णालयात दाखल केले.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. एकूण ४८ मुली व पाच शिक्षक या सहलीत सहभागी झाले होते.