आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BIG BREAKING : राष्ट्रवादीचं प्राबल्य असलेल्या बारामतीतील खादी ग्रामोद्योग संस्थेत भाजप-मनसेचा शिरकाव..!

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : विशेष प्रतिनिधी

राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीत संघर्ष सुरू असतानाच बारामतीतून आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे. येथील बारामती तालुका सहकारी खादी ग्रामोद्योग संस्थेत भाजप आणि मनसेचा शिरकाव झाला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्राबल्य असलेल्या या संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यात आली असून ६ जागा राष्ट्रवादीला, तर भाजपला ४ आणि मनसेला एक जागा देण्यात आली आहे. या बिनविरोध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

बारामती तालुका सहकारी खादी ग्रामोद्योग संस्थेवर राष्ट्रवादीची वर्षानुवर्षे एकहाती सत्ता आहे. अनेक वर्षांपासून या संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या संस्थेचे जवळपास २२०० मतदार आहेत. विशेष म्हणजे जवळपास ९० टक्क्यांहून अधिक मतदार राष्ट्रवादीला मानणारे आहेत. असे असताना काल या संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि मनसेला सोबत घेत राष्ट्रवादीने निवडणूक बिनविरोध केली आहे.

बारामती तालुका सहकारी खादी ग्रामोद्योग संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. मात्र या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकण्याची खात्री असतानाही भाजप आणि मनसेला पाच जागा देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या संस्थेच्या मतदारांची माहिती घेतल्यास भाजप किंवा मनसेला यश मिळेल अशीही स्थिती नाही. असे असताना ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आणि त्यामध्ये भाजप व मनसेला प्रवेश देण्याचे कारणच काय असाही सवाल कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे.

एकीकडे राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीत संघर्ष सुरू असताना बारामतीतील सहकारी संस्थेत भाजपला राष्ट्रवादीनेच एंट्री दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात होत असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीत हीच परिस्थिती राहणार का असा सवाल उपस्थित होत आहे. त्याचवेळी आवश्यकता नसताना भाजप व मनसेला पाच जागा दिल्यामुळे या संस्थेत काम करू इच्छिणाऱ्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करत या प्रकाराबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे दाद मागणार असल्याचे म्हटले आहे.

वास्तविक बारामतीतील सर्वच सहकारी संस्थांवर राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व आहे. आजवर कोणत्याही संस्थेत विरोधकांचा विचार केला गेला नाही. मात्र खादी ग्रामोद्योग संस्थेच्या निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादीकडूनच भाजप आणि मनसेला स्थान दिल्यामुळे उलटसुलट चर्चा होत आहेत. दरम्यान, या संदर्भात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या निवडणुकीबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं सांगत फोन डिस्कनेक्ट केला.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us