आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BIG BREAKING : बेकायदेशीर अकॅडमींना सहकार्य करणाऱ्या बारामतीं, इंदापूर आणि दौंड तालुक्यातील शाळांना शिक्षण विभागाची नोटीस; शाळांची मान्यता रद्द होणार का..?

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी  

बारामती शहर आणि परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अकॅडमींना आर्थिक लाभासाठी सहकार्य करणाऱ्या बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यातील शाळांना शिक्षण विभागाने नोटीस काढत खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. मात्र शिक्षण विभागाकडून दोषी शाळांच्या मान्यता रद्द होणार का याकडे आता लक्ष लागले आहे.

बारामती शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अकॅडमींचे पेव फुटले आहे. गुणवत्तेच्या नावाखाली पालकांकडून अवास्तव शुल्क आकारत शिक्षणाचा धंदा चालवला आहे. विशेष म्हणजे या अकॅडमीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश बारामती व इंदापूर तालुक्यातील शाळांमध्ये दाखवले जात असल्याचेही समोर आले आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी शिक्षण विभागाकडेही तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार आता बारामती व इंदापूर तालुक्यातील जवळपास १२ शाळांना शिक्षण विभागाकडून नोटीस काढण्यात आली आहे.

शासनाच्या नियमांची पायमल्ली करत या शाळा बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांना प्रवेश देत असल्याचं समोर आलं आहे. परिक्षांमध्ये बसण्यासाठी विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थिती गरजेची असते. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थी शाळेत न जाताही या शाळांमध्ये त्यांची उपस्थिती दाखवली जाते. वास्तविक हे विद्यार्थी दिवसभर अकॅडमीतच असतात, मग त्यांना शाळेत जाण्यासाठी वेळ मिळतो कधी असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. ही बाब मोहसीन पठाण यांनी शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून देत कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार आता या शाळांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.

शाळांकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली..?

राज्य शासनाकडून शाळांना मान्यता देताना अनेक नियम लावले जातात. या नियमांचे काटेकोर पालन होत आहे का याचीही तपासणी होत असते. मात्र आर्थिक लाभापायी बेकायदेशीर अकॅडमींना सहकार्य करणाऱ्या या शाळांकडून सर्रास शासनाच्या नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. प्रवेशाच्या अटींची कोणतीही पूर्तता नसताना या शाळा प्रवेश देत आहेत. त्यामुळे आता शिक्षण विभागाकडून त्यांच्यावर कारवाई होते का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us