
बारामती : प्रतिनिधी
एका मद्यधुंद शिक्षकाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच वामकुक्षी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारामती तालुक्यातील तरडोलीनजिकच्या भोईटेवाडी येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक भरत चव्हाण याने दारु पिऊन शाळेतच ताणून दिली. स्थानिक ग्रामस्थांनी शाळेत धाव घेतल्यानंतर मद्यधुंद अवस्थेतील या शिक्षकाने तिथून पळ काढला. दरम्यान, शाळेतच ताणून देणाऱ्या या शिक्षकावर कठोर कारवाईचे संकेत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
काल शुक्रवारी भोईटेवाडी शाळेत ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक भेट दिली. त्यावेळी शाळेतील सर्व मुले एकाच वर्गात बसली होती. मुख्याध्यापक अशोक जगदाळे हे त्या ठिकाणी उपस्थित होते. शेजारीच असलेल्या एका वर्गखोलीत शिक्षक भरत चव्हाण हा टेबलवरच झोपल्याचं चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आलं.
हा शिक्षक दारु पिलेला असल्याचं लक्षात आल्यानंतर संबंधित ग्रामस्थांनी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला साधं बोलताही येत नव्हतं. त्यामुळं या शिक्षकाच्या प्रतापाचं ग्रामस्थांनी व्हिडीओ चित्रीकरण करत त्याच्याकडे विचारणा केली. त्यानंतर या शिक्षकानं झिंगलेल्या अवस्थेत आपली दुचाकी घेऊन पळ काढला.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दुसरीकडे, या घटनेची चौकशी करण्यासाठी बारामती पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी समिती नेमली आहे. तसेच या मद्यपी शिक्षकावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
संबंधित शिक्षक भरत चव्हाण हा सतत मद्यधुंद अवस्थेतच राहत असल्याचे या निमित्तानं समोर आलं आहे. स्थानिक ग्रामस्थांनी अनेकदा त्याला संधी दिल्यानंतरही त्यामध्ये बदल झाला नाही. त्यानंतर शुक्रवारी हा शिक्षक मद्यधुंद अवस्थेत मिळून आल्यानंतर त्याची तक्रार करण्यात आली आहे.