बारामती : प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते अजित पवार यांना काल एका धक्कादायक प्रसंगाला सामोरे जावे लागले. पुण्यात एका हॉस्पिटलच्या पाहणीदरम्यान चौथ्या मजल्यावर गेल्यानंतर लिफ्ट बंद पडली आणि ती अचानकपणे खाली आदळली.. केवळ नशिब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो, नाहीतर आज श्रध्दांजलीच वहायला लागली असती अशा शब्दात अजितदादांनी कालचा प्रसंग सांगितला.
काल अजितदादा पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, एका हॉस्पिटलचे उदघाटन अजितदादांच्या हस्ते झाले. त्यावेळी पुण्यातील एका ज्येष्ठ डॉक्टरांनी हॉस्पिटल पाहण्याची विनंती केली. आम्ही लिफ्टने चौथ्या मजल्यावर गेलो आणि अचानक लिफ्ट बंद झाली. नंतर अचानक लिफ्ट चालू झाली आणि ती थेट खाली आदळली.
लिफ्ट खाली आल्यानंतर माझ्या अंगरक्षकांनी प्रयत्न करत दार उघडलं आणि आमची सुटका झाली. सुदैवाने मला काही लागलं नाही.. पण त्या डॉक्टरांना थोडी जखम झाली. याबद्दल आम्ही कुणालाही काही बोललो नाही. अगदी सुनेत्राला किंवा आईलाही काही सांगितलं नाही. मिडीयाला बोललो असतो तर लगेच ब्रेकिंग न्यूज झाली असती. त्यामुळं या घटनेबद्दल कुणालाच काही सांगितलं नाही. पण आता राहावलं नाही म्हणून तुम्हाला सांगतोय अशा शब्दात अजितदादांनी पुण्यातला प्रसंग सांगितला.
केवळ तुम्हा लोकांच्या आशिर्वादामुळे वाचलो.. नाहीतर आज श्रद्धांजलीच असती असंही ते म्हणाले. रात्रीच्या वेळी प्रवास टाळण्याबद्दल बोलताना अजितदादांनी हा प्रसंग आपल्या खास शैलीत सांगत पवईमाळ येथील कार्यक्रमाच्या भाषणाची सांगता केली.