
बारामती : प्रतिनिधी
घरातील लहान मुलांना घेऊन पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा विहीरीतील कपारीचा दगड लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे घडली आहे. प्रशांत रामभाऊ घाळे असे या युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत घाळे यांच्या घरी काल जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला होता. आज सकाळी प्रशांत घाळे हे आपल्या भाच्यांना घेऊन गावातील गोरख झारगड यांच्या शेतातील विहिरीवर गेला होता. यावेळी प्रशांतने विहिरीत कुस्ती मारली. मात्र तो वर आलाच नाही. त्यामुळे त्याच्या भाच्यांनी आरडाओरड केली.
नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढून उपचारासाठी नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्रशांत याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी आणि विवाहित बहिणी असा परिवार आहे. या घटनेमुळे झारगडवाडी गावावर शोककळा पसरली आहे.