बारामती : प्रतिनिधी
अवैध दारु धंद्यावर कारवाईची चाहूल लागल्यानंतर पळून जाणाऱ्या एकाचा नदीत बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने पोलिसांवरही हल्ला केल्याची घटना बारामती तालुक्यातील सोनगाव येथे घडली. या घटनेनंतर सोनगावमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
बारामती तालुक्यातील सोनगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू धंदे सुरु आहेत. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर आज उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने या परिसरात पाहणी केली. या दरम्यान, मंगलेश उर्फ बहिऱ्या अशोक भोसले याला पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागल्याने त्याने त्या ठिकाणाहून नदीच्या दिशेने पळ काढला.
पोलिसांच्या भीतीमुळे त्याने नदीत उडी मारली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. त्यामध्ये पोलिसांच्या दोन दुचाकींचे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
त्यांनी संतप्त जमावाची समजूत काढत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, या घटनेनंतर सोनगावमधील वातावरण तणावपूर्ण असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.