बारामती : प्रतिनिधी
वेळ सकाळी साडेसहाची… बारामती शहरातील शारदा प्रांगणात बाळगोपाळांचा उत्साह गगनात मावेनासा झालेला. कोणी पोत्यातील उड्या मारतय, कोणी टायर पळवतय, कोणी गोट्या खेळत होत तर कोणी विटीदांडूचा आनंद लुटतय…काही ठिकाणी सुरपाट्या खेळत आहेत….निमित्त होते एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित केलेल्या मातीतील खेळांच्या जत्रेचे.
मोबाईल, टीव्ही व इंटरनेटमुळे मुलांना पारंपरिक खेळांचा विसर पडत चालला असून मोकळ्या हवेतील खेळणे हळुहळू बंद होत असल्याने या खेळांचा परिचय व्हावा, त्यांना प्रत्यक्ष खेळ खेळता यावेत, या उद्देशाने सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून मातीतील खेळांच्या जत्रेचे रविवारी आयोजन केले गेले.
शारदा प्रांगणात मुलांसोबतच पालकांनीही गोट्या, विटीदांडू, भोवरा, सुरपाट्या, पोत्यातील उड्या, टायर पळविणे, रस्सीखेच, माझ्या आईच पत्र हरवल, गजगे या सारख्या खेळांचा मनसोक्त आनंद लुटला. महिलांनी लंगडी व फुगडीचाही आनंद घेतला. अनेकांनी या जत्रेच्या निमित्ताने हरविलेले बालपण पुन्हा अनुभवले.
मोबाईलच्या गेमचीच सवय असलेल्या बच्चेकंपनीने आज मातीतील खेळ खेळतांना प्रथमच वेगळा अनुभव घेतला. नव्या पिढीला जुने खेळ माहितीच नसल्याने पालकांनी त्यांना हे खेळ कसे खेळले जातात हे समजून सांगितले. रस्सीखेच करताना अनेकदा दोरी तुटली पण आबालवृध्दांचा उत्साह कमी झाला नाही. अनेकांनी हे क्षण मोबाईलच्या कॅमे-यात चित्रित केले. स्वताः सुनेत्रा पवार याही यातील अनेक खेळात स्वताः सहभागी झाल्या.
या खेळाचा समारोप सामूहिक झुंबा नृत्याने झाला. या नृत्यामध्ये मुलांसोबतच महिला आणि पुरुषही उत्साहाने सहभागी झाले. वय आणि पद विसरुन अनेक जण या नृत्य प्रकारात सहभागी झाले. अनेक दिवसानंतर असा निखळ आनंद अनुभवल्याचे अनेकांनी या जत्रेच्या समारोप प्रसंगी नमूद केले.
अशा जत्रांचे वारंवार आयोजन व्हावे….
आजच्या जत्रेचा आनंद घेतलेल्या पालक व मुलांनीही असा उपक्रम दर महिन्यात आयोजित करावा, असा आग्रह सुनेत्रा पवार यांना केला. मुलांची मातीशी असलेली नाळ तुटत चालली असून या मातीतील खेळांमुळे मुलांमध्ये वेगळी उर्जा तयार होत असल्याचे काही पालकांनी या वेळी नमूद केले.