बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी विक्रम आनंदराव भोसले आणि उपाध्यक्षपदी सोनाली दादासो जायपत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आज या निवडी करण्यात आल्या.
बारामती खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आज नव्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक घेण्यात आली. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार अध्यक्षपदासाठी वाणेवाडी येथील विक्रम आनंदराव भोसले आणि उपाध्यक्षपदासाठी मुढाळे येथील सोनाली दादासो जायपत्रे यांची नावे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी जाहीर केली.
अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी दोनच अर्ज आल्यामुळे ही निवड बिनविरोध करण्यात आल्याचे सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे यांनी जाहीर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवत संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी व्यापक काम करू, अशी ग्वाही विक्रम भोसले आणि सोनाली जायपत्रे यांनी निवडीनंतर दिली.