
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरील धोकादायक झाड काढण्याचे काम सुरू असल्यामुळे आज सायंकाळी काही काळ वाहतूक खोळंबली. मात्र राष्ट्रवादी युवकचे नवनियुक्त शहराध्यक्ष अविनाश बांदल आणि सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष तुषार लोखंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उरतून वाहतूक सुरळीत केली. दरम्यानच्या काळात, बारामती नगरपरिषदेच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ हे धोकादायक झाड काढून टाकले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
बारामती शहरातील येस बँकेसमोर एका झाडाला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे हे झाड कोणत्याही स्थितीत पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी बारामती नगरपरिषदेच्या उद्यान विभागाला कळवली. उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी पाहणी करत झाड पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज सायंकाळी झाड पाडण्याची मोहीम राबवण्यात आली.
हे झाड पाडत असताना भिगवण रस्त्यावरील वाहतूक एकाच रस्त्यावरून सुरू होती. त्यामुळे पाटस रस्त्याकडे जाणाऱ्या रेल्वे उड्डाणपूल चौकात काही काळ वाहतूक खोळंबली. ही बाब लक्षात घेत राष्ट्रवादी युवकचे नवनियुक्त शहराध्यक्ष अविनाश बांदल, सोशल मिडिया सेलचे शहराध्यक्ष तुषार लोखंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उतरत ही वाहतूक सुरळीत केली.
एकाच रस्त्यावरून वाहतूक सुरू असल्याची बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांनी वाहने शिस्तीत बाजूला घेत वाहतुकीत झालेला खोळंबा दूर केला. त्याचवेळी नगरपरिषदेच्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनीही धोकादायक स्थितीतील झाड काढत भविष्यातील धोका टाळला.