
बारामती : प्रतिनिधी
संत निरंकारी परिवाराच्या माध्यमातून उद्या मंगळवार दि. ६ फेब्रुवारी रोजी बारामती शहरात निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमीतजी यांच्या समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या मैदानात होत असलेल्या या कार्यक्रमानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मानव कल्याणार्थ प्रचार यात्रेदरम्यान माता सुदीक्षाजी महाराज या बारामतीत येत आहेत. मंगळवार दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत हा संत समागम होणार आहे. मानवी जीवन अंतर्मनातील शांतीसुखाने परिपूर्ण करत विश्वामध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा कल्याणकारी संदेश जनमानसापर्यंत पोहचविणे हाच या संत समागमाचा उद्देश आहे.
येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या मैदानात होत असलेल्या या कार्यक्रमासाठी बारामतीत निरंकारी सेवा दलाच्या स्वयंसेवकांनी जय्यत तयारी केली आहे. या समागम कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतील असा अंदाज असून त्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात येत आहे.