बारामती : प्रतिनिधी
बारामतीत आज दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. बारामती नगरपरिषदेसमोरील रस्त्यासह शारदा प्रांगणाला तर अक्षरश: तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. या रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना मात्र मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, पावसाचे पाणी रस्त्यावर साचू नये यासाठी बारामती नगरपरिषदेने केलेली उपाययोजना कुचकामी ठरल्याची चर्चा या निमित्तानं होऊ लागली आहे.
बारामती शहर आणि परिसरात आज दुपारनंतर वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बारामती शहरातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. बारामती नगरपरिषदेसमोरच असलेल्या रस्त्यावर तब्बल एक फूटापर्यंत पाणी साचलं होतं. त्यामुळे वाहनचालकांना या पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागली. तर शारदा प्रांगणात साचलेल्या पाण्यामुळे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. एकूणच शहरात विविध भागात कमी जास्त प्रमाणात अशीच परिस्थिती पाहायला मिळाली.
मागील काळात बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून पावसाचे पाणी साचू नये यासाठी उपाययोजना करण्यात आली होती. त्यासाठी लाखो रुपये खर्चही करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे ही उपाययोजना कुचकामी ठरल्याचे पाहायला मिळाले. आज मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याचा नागरिकांना त्रास सोसावा लागला. त्यामुळे आता नगरपरिषद प्रशासन यापुढे खबरदारी घेईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.