
बारामती : प्रतिनिधी
बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या रविवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’चं आयोजन करण्यात आलं आहे. बारामती शहरात प्रथमच इतक्या मोठ्या स्वरूपात ही मॅरेथॉन होत असून त्याची जय्यत तयारी आयोजकांकडून करण्यात आली आहे. प्रथमच होत असलेल्या या मॅरेथॉनचा थरार रविवारी बारामतीकरांना अनुभवता येणार आहे.
निरोगी जीवनाचा संदेश युवकांमध्ये जावा आणि त्यांच्यामध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आल्याचं फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश ननवरे यांनी सांगितले. तालुकास्तरावर पूर्ण अंतराची अर्थात ४२ किमीची मॅरेथॉन पहिल्यांदाच बारामतीत होणार आहे.
वर्ल्ड अॅथेलेटीक असोसिएशनच्या मान्यतेने ४२, २१ आणि १० किमी अशा तीन प्रकारात ही मॅरेथॉन पार पडणार आहे. त्याचवेळी पाच किमी फन मॅरेथॉनचेही आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कॉम्रेड मॅरेथॉनसाठी पात्रता निकषांमध्ये बारामती पॉवर मॅरेथॉन ग्राह्य मानली जाणार आहे. त्यामुळे देशभरातील मॅरेथॉनपटू यात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
सध्या या मॅरेथॉनची तयारी अंतिम टप्प्यात आली असून देशभरातील मॅरेथॉनपटूंच्या स्वागतासाठी बारामती सज्ज झाली आहे. या ठिकाणी येणाऱ्या धावपटूंना कोणत्याही सुविधांची कमतरता भासू नये यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. एकूणच बारामतीकरांना या मॅरेथॉनच्या निमित्तानं एक वेगळा थरार अनुभवायला मिळणार असल्याचे सतीश ननवरे यांनी सांगितले.