
बारामती : प्रतिनिधी
अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आज बारामती शहर आणि परिसरात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. शहरातील नागरिक आणि विविध संघटनांनी वेगवेगळ्या पद्धतीने आजच्या सोहळ्याचा आनंद साजरा केला. बारामती शहरातील ऐतिहासिक असलेल्या देवळे यांच्या श्रीराम मंदिरात बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.
बारामती शहरात आज श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला. अनेक नागरिकांनी आपल्या घरांवर गुढ्या उभारल्या. तसेच विद्युत रोषणाई करून घरासमोर रांगोळ्या काढत आकर्षक सजावट केली. येथील श्रीराम मंदिरात टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रीराम मंदीरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. तर सकाळी महिलांकडून सुंदरकांड वाचन करण्यात आले. तसेच हनुमान चालिसा पठण आणि श्रीरामांची आरती करण्यात आली. रामनामाच्या जयघोषामुळे मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी किशोर देवळे, मकरंद देवळे, योजना देवळे, नेहा देवळे, ओंकार देवळे, पूजा देवळे आदी उपस्थित होते.
दरम्यान, आजच्या सोहळ्यानिमित्त बारामती शहर सजले होते. शहरात ठिकठिकाणी भव्य स्वरूपात फलक लावण्यात आले. तसेच अनेक ठिकाणी विविध मंडळे तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मिठाई वाटपही केले. सायंकाळी शहरात मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले होते.