बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील एका व्यापाऱ्याला एका परप्रांतीय व्यक्तीकडून ७५ टन साखर मागवणं चांगलंच महागात पडलं आहे. साखरेसाठी तब्बल २५ लाख रुपये बँक खात्यात वर्ग करूनही साखरच मिळाली नाही. शेवटी या व्यापाऱ्याने बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मनसुखलाल गोकुळदास गुंदेचा (पुनव कार्पोरेशन, रा. सातव चौक, बारामती) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हरी किशन सिंग (रा. कैलाना खास, ता. गोहना, सोनिपत, हरीयाणा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, गुंदेचा यांचा बारामतीमध्ये होलसेल साखर विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी हरीकिशन सिंग याच्याकडे ७५ टन साखर विक्रीसाठी मागवलेली होती.
१७ सप्टेंबर २०२१ ते १८ सप्टेंबर २०२१ या दरम्यान गुंदेचा यांनी सिंग याला साखरेच्या बिलापोटी २५ लाख ३४ हजार रुपये रक्कम दिली होती. ही रक्कम सिंग याच्या खात्यावर आरटीजीएसने पाठवण्यात आली होती. परंतु अनेक दिवस उलटल्यानंतरही साखर तर मिळाली नाहीच. परंतु गुंदेचा यांनी दिलेली रक्कमही परत मिळत नव्हती. गुंदेचा यांनी अनेकदा पाठपुरावा केल्यानंतरही संबंधित व्यक्ती साखर किंवा रक्कमही परत करत नसल्यामुळे शेवटी त्यांनी दोन वर्षांनंतर पोलिसांत धाव घेतली.
गुंदेचा यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी हरी किशन सिंग याच्यावर भादंवि कलम ४०६ व ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास बारामती शहर पोलिस करीत आहेत.