बारामती : प्रतिनिधी
बारामती एमआयडीसीतील विद्या कॉर्नरमध्ये असलेल्या ग्राऊंड अप नावाच्या कॅफेमध्ये भलताच प्रकार घडत असल्याची बाब समोर आली आहे. या कॅफेमध्ये अल्पवयीन मुले-मुली बसून अश्लील चाळे करत असल्याचं उघड झालं आहे. बारामती तालुका पोलिसांनी या कॅफेवर धाड टाकत कॅफे मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.
कॅफेमालक सुहास तानाजी कदम आणि व्यवस्थापक मयूर बाळू कदम या दोघांवर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत माहिती अशी की, बारामती एमआयडीसीतील ग्राऊंड अप कॅफेमध्ये भलतेच उद्योग सुरू असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रारी दिल्या होत्या. त्यानुसार बारामती तालुका पोलिसांनी या कॅफेवर टाकली. त्यावेळी पडद्याच्या आडोशाला अल्पवयीन मुले-मुली अश्लील चाळे करत बसल्याचे आढळून आल्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी कॅफे मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. बारामती एमआयडीसीत अनेक सायबर कॅफे तसेच कॉफी शॉप आहेत. त्यामध्ये मुला-मुलींना बसण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक मुले-मुली या कॅफेत जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यातून काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलिस आणि निर्भया पथकाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, एमआयडीसीत सायबर कॅफे तसेच कॉफी शॉपमध्ये असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे बोलले जात आहे. यावरही पोलिसांकडून कारवाई होणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.