
बारामती : प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी येथे दोन गटात चांगलीच धुमश्चक्री झाली. यात एकमेकांवर दगडफेक करण्यासह वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आता वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोन्ही गटातील जवळपास ९६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर सायंबाचीवाडी गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
सायंबाचीवाडी ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान पार पडल्यानंतर काल मतमोजणी झाली. या निवडणुकीत उद्योजक दुर्योधन भापकर यांच्या नेतृत्वाखालील श्री स्वयंभू परिवर्तन पॅनेल आणि डी. पी. जगताप यांच्या नेतृत्वाखालील श्री स्वयंभू हिराबाई माता ग्रामविकास पॅनेल यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामध्ये जगताप यांच्या पॅनेलचे पाच उमेदवार निवडून आले. मात्र भापकर यांच्या पॅनेलने सरपंचपदासह दोन जागांवर विजय मिळवला.
दरम्यान, काल निकालानंतर जगताप यांच्या पॅनेलचे कार्यकर्ते देवदर्शनासाठी जात होते. त्याचवेळी भापकर यांच्या पॅनेलचे कार्यकर्तेही तिथे पोहोचले. दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर हा वाद इतका वाढला की थेट एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. त्यातूनच वाहनांच्या काचाही फोडल्या गेल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे हा वाद थांबला. परंतु या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
या राड्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक तौसीफ महम्मद मनेरी यांनी फिर्याद दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जमाव बंदी ,शस्त्र बंदीचे आदेश दिलेले असताना त्यास न जुमानता पोलिसांच्या समोरच सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमवून मारामारी, दंगा करून शांतता भंग केली. तसेच खाजगी गाड्यांच्या काचा फोडून नुकसान केल्याप्रकरणी तब्बल ९६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम १४३, १४७,१४८,१४९,१६०,१८८, ३२४, ३२३, ४२७ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९९१ चे कलम ३७ (१ )/१३५ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
दुर्योधन भापकर, साहेबराव भापकर, गौरव भापकर, निखील भापकर, आदित्य भापकर, हर्षद भापकर, मयुर भापकर, विजय भापकर, केशव भापकर, दिपक भापकर, विकास अभंग, नानासो भापकर, सुरज जगताप, वैभव भापकर, मंथन भापकर, सौरभ घाडगे, यश भापकर, प्रविण जगताप, यश जगताप, भरत आंधळे, ऋषिकेश जगताप, वैभव जगताप, हणुमंत भगत, विकास जगताप, श्रीकांत भापकर, मेघराज जगताप, रघुनाथ भगत, सुभाष जगताप, मयुर जगताप, प्रतिक जगताप, मंगेश जगताप, प्रणव जगताप, शतायु जगताप, दिलीप जगताप, प्रमोद जगताप, निलेश जगताप आणि इतर ५० ते ६० अशा जवळपास ९६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.