आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BARAMATI BREAKING : ग्रामपंचायत निवडणुक निकालानंतर सायंबाचीवाडीत दोन गट भिडले; दगडफेक करत वाहनांच्या काचा फोडल्या..!

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी येथे दोन गट आमनेसामने आले. एकमेकांवर दगडफेक करण्यापासून वाहनांच्या काचा फोडण्यापर्यंत हा वाद पेटला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आता सायंबाचीवाडीत तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, या घटनेनंतर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

सायंबाचीवाडी ग्रामपंचायतीसाठी काल मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणी झाली. या निवडणुकीत उद्योजक दुर्योधन भापकर यांच्या नेतृत्वाखालील श्री स्वयंभू परिवर्तन पॅनेल आणि डी. पी. जगताप यांच्या नेतृत्वाखालील श्री स्वयंभू हिराबाई माता ग्रामविकास पॅनेल यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामध्ये जगताप यांच्या पॅनेलचे पाच उमेदवार निवडून आले. मात्र भापकर यांच्या पॅनेलने सरपंचपदासह दोन जागांवर विजय मिळवला.

निकालानंतर जगताप यांच्या पॅनेलचे कार्यकर्ते देवदर्शनासाठी जात होते. त्याचवेळी भापकर यांच्या पॅनेलचे कार्यकर्तेही तिथे पोहोचले. दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर हा वाद इतका वाढला की थेट एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. त्यातूनच वाहनांच्या काचाही फोडल्या गेल्या.

आज सायंबाचीवाडी गावाची यात्रा सुरु आहे. अशातच हा राडा झाल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या असून वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us