बारामती: प्रतिनिधी
बारामती शहरातील बारामती हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन दुचाकीवरून घरी जात असताना हायवा ट्रकच्या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना प्रशासकीय भवनासमोर घडली. या अपघातात मृत युवकाची आई गंभीर जखमी झाली आहे.
तेजस विजय कासवे (वय २१ वर्ष) असं या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. तर आई राधिका कासवे या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत माहिती अशी की, तेजस कासवे हा दोन दिवसांपूर्वी आपल्या नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी बारामती हॉस्पिटल येथे दाखल झाला होता. काल त्याच्या नाकावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर आवश्यक उपचार घेऊन त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
सायंकाळी तो आपल्याआईसह दुचाकीवरून जात असताना दहाचाकी हायवा ट्रकला धडक बसली. त्यामध्ये तेजसचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात त्याची आई राधिका कासवे या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व सोपस्कार पूर्ण केले.
भरधाव वाहनांवर कारवाई गरजेची
दरम्यान,या रस्त्यावर अवजड वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने अशा अवजड आणि भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर अंकुश ठेवून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.
दुभाजकातील वाढलेली झाडे देतायत आपघाताला निमंत्रण
दुसरीकडे रिंगरोडवरील दुभाजकांच्या मध्ये बारामती नगर परिषदेने लावलेली झाडे देखील अस्तव्यस्त वाढली आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडत असताना अनेकदा दुसऱ्या बाजूने येणारे वाहन दिसत नाही. त्यातून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. बारामती नगर परिषदेचे देखील रस्त्याच्या दुभाजकांमध्ये लावलेल्या झाडांकडे दुर्लक्ष होत असून त्यांनी अस्तव्यस्त वाढलेली झाडे तात्काळ कापली पाहिजेत, असेही नागरिकांमधून बोलले जात आहे. तसेच प्रशासकीय भवनासमोरुन जाणाऱ्या रिंगरोडवर गतिरोधक नसल्याने देखील अपघात होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्वरित त्या रस्त्यावर गतिरोधक करणे गरजेचे आहे.