बारामती : प्रतिनिधी
बारामतीतील बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना गजाआड करण्यात आले आहे. वाहक आणि प्रवाशांच्या दक्षतेमुळे या दोन महिलांना बारामती शहर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या महिलांकडे एक मंगळसूत्र मिळून आले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
सध्या एसटी बसमध्ये ५० टक्के सवलत मिळत असल्यामुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बसस्थानकावर महिलांची मोठी गर्दी होताना दिसते. याच गर्दीचा फायदा घेऊन काही संशयित महिला दागिन्यांची चोरी करत असल्याचे समोर आले आहे. या महिला बसमध्ये चढताना किंवा गर्दीमध्ये हातचलाखी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आज बारामतीतील बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन महिलांना वाहक आणि प्रवाशांनी पकडले. सोना घायाळ काळे (वय ३८, रा. चिकुर्डे, ता. वाळवा) आणि सुनीता तात्या शिंदे (वय ४५, रा. मांडवखडक, ता. फलटण) अशी या महिलांची नावे आहेत. या दोघींवर बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी या दोघींची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे दिड तोळे वजनाचे मंगळसूत्र मिळून आले आहे. हे मंगळसूत्र कोणाचे याची माहिती त्या दोघींना देता आलेली नाही. पोलिसांनी या दोघींची कसून चौकशी सुरु केली असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर, सहाय्यक पोलीस फौजदार आबा जगदाळे, महिला पोलीस कर्मचारी सुप्रिया कांबळे, पोलीस कर्मचारी मोना माकर, ऋतुजा गवळी, पोलीस हवालदार संध्याराणी कांबळे यांनी ही कारवाई केली.