बारामती : प्रतिनिधी
किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बारामती शहरातील अनंतनगर वसाहत परिसरात घडली. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारींवरून एकूण १५ जणांवर दंगलीसह विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत बारामती शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार दि. ११ जानेवारी रोजी सायंकाळी बारामती शहरातील अनंतनगर वसाहत परिसरात दोन गटात हाणामारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असता त्या ठिकाणी महिलांसह पुरुषांच्या गटात वादावादी सुरू असल्याचे आढळले. भंगार गोळा करण्यावरून किरकोळ वाद वाढत जाऊन ही हाणामारी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या प्रकरणी एका गटातील धनंजय तेलंगे, ऋषिकेश तेलंगे, रोहित तेलंगे, चिंट्या सुतार, मयूर सुतार, तुषार शिंदे, करण शिंदे, गोविंद तेलंगे, बबलू कसबे, करण दिवटे यांच्यावर आणि दुसऱ्या गटातील करण विलास सकट, श्याम विलास सकट, निलेश सकट, बेबीताई विलास सकट, बेबीताई विलास सकटची मुलगी रेश्मा (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यावर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, या घटनेवेळी वाद मिटवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही महिलांनी अडवले. अक्षरश: काही महिला पोलिसांच्या गाडीलाही आडव्या गेल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली. दोन्ही गटातील लोकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी संबंधितांवर विनयभंगासह दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत.
किरकोळ कारणावरून काहीजण मोठा वाद सुरू करतात. त्यामुळे गंभीर गुन्हे घडत आहेत. या पार्श्वभूमीवर गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. सातत्याने गुन्ह्यात समावेश आढळल्यास संबंधितांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.