बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील एका लॉजवर महिलेचा तिच्या पतीनेच खून केल्याचं उघड झालं आहे. चारित्र्याच्या संशयातून त्यानं आपल्या पत्नीचा धारदार शस्त्राने खून करून पळ काढल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी संबंधित महिलेच्या पतीवर गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीच्या शोधाला सुरुवात केली आहे.
रेखा विनोद भोसले (वय ३६, रा. सोनवडी, ता. दौंड) असं मृत महिलेचं नाव असल्याचं निष्पन्न झालं आहे. तर तिच्या खून प्रकरणी तिचा पती विनोद गणेश भोसले (रा. शास्त्रीनगर, डोंबिवली) याच्यावर बारामती शहर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत महिलेचे वडील महादेव धोंडीबा सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे.
काल सायंकाळी बारामती शहरातील एका लॉजमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. संबंधित महिला आपल्या पतीसह या लॉजमध्ये आली होती. त्यानंतर काही वेळाने या महिलेचा पती विनोद भोसले हा निघून गेला. त्याने आपण पत्नीचा खून केल्याची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.
चारित्र्याच्या संशयातूनच या महिलेचा खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेचा अधिक तपास बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे व सहाय्यक पोलिस निरीक्षक चेके यांच्या पथकामार्फत सुरू आहे.