आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BARAMATI BREAKING : सुप्रियाताईंचा पाठपुरावा अन् अजितदादांची तत्परता; बारामती शहरातील रेंगाळलेल्या सर्व्हिस रोडचं काम उद्यापासून होणार सुरू

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील सर्व्हिस रोडचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलं होतं. रेल्वेकडून जागा हस्तांतरीत होत नसल्यामुळे हे काम प्रलंबित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर अखेर या जागेसाठी रेल्वे विभागाकडून करार करण्यात आला असून उद्यापासूनच या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बारामती शहरातील भिगवण रस्त्याच्या दुतर्फा सेवा रस्ता बनवण्यात आला आहे. तीन हत्ती चौक ते बारामती न्यायालयापर्यंत हा सेवा रस्ता आहे. न्यायालयापासून नटराज नाट्य कला मंडळापर्यंत हे काम पूर्ण होऊन त्याचा वापरही सुरू झाला. परंतु पंचायत समिती ते तीन हत्ती चौकापर्यंतचे काम रेल्वेच्या जागेत असल्यामुळे रेंगाळले होते. त्यामुळे या रस्त्याचे काम पूर्ण कधी होणार असा प्रश्न नागरिकांना पडला होता.

या रस्त्यालागत विद्या प्रतिष्ठान बालविकास मंदिर आणि मएसो विद्यालय अशा दोन शाळा आहेत. तसेच समोरील बाजूला रेल्वे धक्का आहे. त्यामुळे हा सेवा रस्ता पूर्ण करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वारंवार सूचना दिल्या जात होत्या. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडे पत्र व्यवहारही करण्यात आला होता. त्यावर दि. २ मार्च २०२१ रोजी रेल्वे विभागाने ७५० मीटर लांबीच्या या सेवा रस्त्यासाठी ७ कोटी ३२ लाख रुपये एवढे शुल्क भरण्याची मागणी केली होती.

या दरम्यान, बारामती नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव यांच्यासह गणेश सोनवणे, अविनाश बांदल, अनिकेत पवार, सचिन मत्रे, तुषार लोखंडे, मंगेश ओमासे, सागर निकम आदींनी आंदोलन करत रेल्वे धक्का बंद पाडला. रस्त्याचे काम होणार नसेल तर रेल्वे धक्क्याकडे ये-जा करणारी वाहनेही इतर रस्त्याने आणावीत अशी भूमिका त्यांच्याकडून घेण्यात आली. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलनात मध्यस्थी करत रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

या आंदोलनानंतर अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्यातही चर्चा झाली. त्यानुसार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत आकारले जाणारे शुल्क कमी करण्याची मागणी केली. त्यानुसार अश्विनी वैष्णव यांनी ६ टक्क्यांऐवजी १.५ टक्के शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बारामती नगरपरिषदेकडून या रस्त्याच्या जागेसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला. परंतु रेल्वे प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा प्रस्ताव मागवला.

त्यानुसार जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी तात्काळ हा प्रस्ताव दाखल केला. त्यावर १ कोटी ३१ लाख ७८ हजार ४४१ रुपये इतके शुल्क भरून जागा वापरण्याच्या सूचना केल्या. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तात्काळ शुल्क भरण्यास मान्यता दिली आणि काल रेल्वे प्रशासनासोबत या रस्त्याच्या जागेसाठीचा करार करण्यात आला आहे. त्यामुळे आता उद्यापासूनच या रस्त्याचे काम सुरू केले जाणार आहे. या कामी अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे प्रशासन, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी विशेष सहकारी केल्याचे सचिन सातव यांनी सांगितले.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us