
बारामती : प्रतिनिधी
आपल्या समर्थक आमदारांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-शिवसेना सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर जवळपास दीड महिन्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार हे काल रात्री बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी आले. त्यांनी आज दिवसभर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीबरोबरच काही जिल्हा व तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेत मार्गदर्शनही केलं.
राज्यातील राजकीय घडामोडीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचा एकही दौरा बारामतीत झाला नाही. काल शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यानंतर रात्री ते थेट बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी दाखल झाले. आज सकाळपासूनच शरद पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
सकाळच्या सत्रात शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर दुपारी विविध जिल्ह्यातून आणि तालुक्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत तुमच्या सोबतीने येणाऱ्या काळात जोमाने लढू अशी ग्वाही दिली. यावेळी त्यांनी भाजप सरकारकडून सुरु असलेल्या सत्तेच्या गैरवापराबद्दलही भाष्य केले. ईडीसारख्या संस्था हाताशी धरून दबाव आणला जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
या राजकीय घडामोडीनंतर मी जिथे जाईन तिथे लोक सोबत असल्याचं सांगतात, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. लोक आपल्या सोबत आहेत, त्यामुळे यश-अपयश याचा विचार न करता आपण लढत राहणार असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, राज्यभरातील अनेक कार्यकर्त्यांनी आज गोविंद बागेत शरद पवार यांची भेट घेतली. तर सोलापूर जिल्ह्यातील काही भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशही केला.