
बारामती : प्रतिनिधी
नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन बंद झाल्यामुळे बारामती नगरपरिषदेने शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हा निर्णय स्थगित करण्यात आला असून बारामतीकरांना पूर्ववत पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे.
नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन सध्या बंद आहे. त्यामुळे आगामी काळात पाण्याचा पुरवठा आणि उपलब्धता याची सांगड घालण्यासाठी म्हणून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार होती. मात्र तत्पूर्वीच नगरपरिषदेने हा निर्णय स्थगित केला आहे.
पाणी कपातीचा निर्णय स्थगित केल्यामुळे बारामती नगरपरिषदेकडून आता बारामती शहरात पूर्वीप्रमाणेच नियमित पाणीपुरवठा होणार आहे. नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन बंद असले तरी शहरात साठवण तलावाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत असते. त्यामुळे आता बारामतीतील पाणी कपात रद्द झाली असून बारामतीकरांना नियमित पाणीपुरवठा होणार आहे.