बारामती : प्रतिनिधी
लग्नाचं आमिष दाखवत एका तरुणीवर वेळोवेळी शारीरीक संबंधित ठेवत नंतर खालच्या जातीची असल्याचं सांगत लग्नाला नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात लग्नाला नकार देणाऱ्या मुलासह संबंधित पीडितेला धमकावणाऱ्या पित्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय विजय निगडे आणि त्याचे वडील विजय निगडे अशी या दोघा बापेलेकाची नावे आहेत. ७ जुलै २०२२ ते ५ मे २०२४ या कालावधीत ही घटना घडली आहे. याबाबत २५ वर्षीय युवतीने बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, अक्षय विजय निगडे याने संबंधित युवतीला लग्नाचं आमिष दाखवत तिच्या इच्छेविरूद्ध पाचगणी, महाबळेश्वर येथे नेऊन तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
लग्नाचा विषय निघाल्यानंतर अक्षय निगडे याने तू खालच्या जातीची आहेस, मी उच्च जातीचा आहे. तुझ्याशी लग्न केल्यास माझी समाजात इज्जत राहणार नाही असे म्हणत संबंधित युवतीला लग्नासाठी नकार दिला. त्याचवेळी अक्षयचे वडील विजय निगडे यांनी या युवतीला इथून निघून जा अन्यथा तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली. त्यानुसार संबंधित युवतीने बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणी अक्षय निगडे व विजय निगडे या दोघांवर भादंवि कलम ३७६, ३५४, ३५४ (अ), ५०४, ५०६, ३४ आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.