आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BARAMATI BREAKING : बारामती तालुक्यातील काऱ्हाटीत अवैध वाळू उपशावर पोलिसांची धाड; सुपे पोलिसांनी ३३ लाखांच्या मुद्देमालासह चौघांना केली अटक

बारामती
ह्याचा प्रसार करा

सुपे : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात कऱ्हा नदीपात्रातून अवैध वाळू उपशावर सुपे पोलिसांनी धाड टाकण्यात आली आहे. या कारवाईत वाळूसह दोन ट्रक, स्विफ्ट कार असा ३३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सुपे पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे.

सुपे पोलिसांनी अवैध वाळू उपसा प्रकरणी ट्रक चालक महेश राजेंद्र यादव (वय ३१ वर्षे रा. मुरूम ता. उमरगा जि. उस्मानाबाद), चेतन मारूती वाबळे (वय २५ वर्षे रा. उरुळी कांचन ता. हवेली), ट्रक मालक आकाश रावसाहेब व्यवहारे (रा. लोणी काळभोर ता. हवेली), नामदेव पोपट वाघमोडे (रा. उरुळीकांचन ता. हवेली) आणि वाळु भरून देणाऱ्या देवा जगताप (रा. जळगाव ता. बारामती) या पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सुपे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार दि. ३० ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास काऱ्हाटी येथील कऱ्हा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील हे आपल्या पथकासह काऱ्हाटी गावातून जळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर दबा धरून बसले. साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोन ट्रक लाईट बंद ठेवून संशयितरित्या येताना दिसले.

पोलिसांनी हे ट्रक थांबवून चौकशी केली असता त्यामध्ये विनापरवाना वाळू नेली जात असल्याचे आढळून आले. संबंधित चालकाकडे विचारणा केल्यानंतर ट्रकमालक मागून येत असल्याचे सांगितले. त्यानुसार स्विफ्ट (क्र. एमएच १२ एनई ७८८१ ) कारमधून आलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच ट्रकमधून दोघांना अटक करण्यात आली आहे.  या कारवाईत ८० हजार रुपये किमतीची १० ब्रास वाळू, टाटा कंपनीचे दोन ट्रक (क्र. एमएच १२ डीजी ०४४२) आणि (क्र. एमएच १२ एनएक्स ३४३३), स्विफ्ट कार असा एकूण ३३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अवैध वाळू उपसाप्रकरणी  सुपे पोलिसांनी महेश यादव, चेतन वाबळे, आकाश व्यवहारे, नामदेव वाघामोडे आणि देवा जगताप या पाचजणांवर भादंवि कलम ३७९, ३४ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ९/१५ आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान लवटे हे करीत आहेत.

दरम्यान, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलिस उपनिरीक्षक समाधान लवटे, पांडुरंग कन्हेरे, सहाय्यक फौजदार रविंद्र मोहोरकर, राहुल भाग्यवंत, अनिल दणाणे,  संदिप लोंढे, सचिन दरेकर,  तुषार जैनक, होमगार्ड दिपक धायगुडे, रविंद्र धायगुडे यांनी ही कारवाई केली.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us