
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निरावागज येथे वीज कोसळल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. नारायण पवार (वय ६०) असे या जखमी व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माहिती घेत संबंधित रुग्णावर उपचाराबरोबरच शासकीय मदत मिळवून देण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.
याबाबत माहिती अशी की, उरुळीकांचन येथील नारायण पवार हे मजुरीनिमित्त बारामती तालुक्यातील निरावागज येथे वास्तव्यास आले होते. या ठिकाणी पाल टाकून ते राहत होते. काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक वीजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून साहेबराव पवार हे गंभीररित्या जखमी झाले. पवार यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेची विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माहिती घेत संबंधित रुग्णावर उपचाराबाबत स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांना सूचना केल्या. या रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेत शासकीय पातळीवरून संबंधित कुटुंबीयांना मदत मिळवून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. त्यानंतर सुनील मुसळे यांनी रुग्णालयाशी संपर्क साधत संबंधित रुग्णावर योग्य पद्धतीने उपचार करण्याबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. तसेच प्रशासकीय पातळीवरून या रुग्णाला मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला आहे.