बारामती : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला बारामतीतील सकल मराठा समाजाने पाठिंबा देत साखळी अन्नत्याग उपोषण सुरू केलं होतं. काल जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतल्यानंतर बारामतीत सुरू असलेलं उपोषण स्थगित करण्यात आलं आहे. सरकारने दिलेल्या मुदतीत मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा अन्यथा मुंबईत धडक मोर्चा नेणार असल्याचं निवेदन यावेळी देण्यात आलं.
बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर मराठा क्रांती मोर्चाकडून साखळी अन्नत्याग उपोषण सुरू केलं होतं. या दरम्यान, सलग अन्नत्याग उपोषण करणाऱ्या काही आंदोलकांची प्रकृतीही ढासळली होती. बारामती तालुक्यातील विविध गावांमधील मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. काल मनोज जरांगे पाटील यांनी माजी न्यायमूर्ती आणि मंत्र्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर सरकारला २ महिन्यांचा वेळ देत आपले उपोषण मागे घेतले.
त्यानंतर आज सकाळी बारामतीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असलेले साखळी अन्नत्याग उपोषण स्थगित करण्यात आले आहे. तहसीलदार गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांना आंदोलन स्थगित केल्याबद्दल निवेदनही देण्यात आले. येणाऱ्या काळात शासनाने सरसकट कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि दिलेल्या मुदतीत आरक्षणाचा विषय मार्गी लावावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
शासनाने दिलेल्या मुदतीत निर्णय न घेतल्यास मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. तसेच आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिल्यास येणाऱ्या काळात थेट मुंबईत धडक मोर्चा काढू असंही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.