बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोनकसवाडी येथील एका घराची कडी उचकटून जवळपास रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ३५ लाख ८० हजार रुपये किमतीचा ऐवज लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर माळेगाव पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली असून आरोपी निष्पन्न करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत हनुमंत आनंदराव कोकरे (वय ६८) यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती अशी की, कोकरे कुटुंबीय सोनकसवाडी येथील कोकरेवस्तीत वास्तव्यास आहेत. त्यांच्या ‘कलानंद’ या निवासाच्या मुख्य दरवाजाची कडी उचकटून बेडरूममधील कपाटातून ६८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ३५ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. सोमवारी सकाळी ६ ते ७ या कालावधीत ही घटना घडली.
ही बाब लक्षात आल्यानंतर कोकरे यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यामध्ये सोन्याचे लॉकेट, वेडणी, बांगडया, पोहेहार, गंठण, कानातील झुबे, राणीहार, नेकलेस, पाटल्या, अंगठी, टॉप आणि वेल यासह दीड लाख रुपये रोख असा ३५ लाख ८० हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी माळेगाव पोलिसांनी भादंवि कलम ४५४ व ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली असून तपासाच्या अनुषंगाने आवश्यक पूर्तता केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपी निष्पन्न करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही अवचर यांनी सांगितले.