
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे येथील महालक्ष्मी ज्वेलर्स या सराफी दुकानावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात गोळीबार करण्यात आला. आज सायंकाळी घडलेल्या या घटनेत एक स्थानिक रहिवासी जखमी झाले आहेत. तर ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत एका दरोडेखोराला पकडले आहे. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सुपे येथील बसस्थानकानजिक महालक्ष्मी ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. आज सायंकाळच्या सुमारास एका कारमधून आलेल्या चौघांनी या दुकानात प्रवेश केला. यातील एकाने स्वत:कडील पिस्तुलमधून गोळीबार केला. त्यामध्ये एकजण जखमी झाला आहे.
गोळीबार झाल्यामुळे ग्रामस्थांनी तात्काळ दुकानाकडे धाव घेत एकाला पकडण्यात यश मिळवले. मात्र यातील तिघेजण फरार झाले आहेत. या घटनेमुळे सुपे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.