
बारामती : प्रतिनिधी
घरगुती वादातून बापाने पोटच्या मुलाच्या डोक्यात गजाने वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना बारामती तालुक्यातील धुमाळवाडी परिसरात घडली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.
गणेश लालासाहेब कोकरे (वय ३०) असे या घटनेतील मृत मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धुमाळवाडी परिसरातील अहिल्यानगर येथे कोकरे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. काल रात्री लालासाहेब धोंडीबा कोकरे आणि त्यांचा मुलगा गणेश यांच्यात वाद झाला. गणेश हा सातत्याने दारू पिऊन त्रास देत होता. त्यातूनच त्याचा वडिलांसोबत कालही वाद झाला.
या वादात वडील लालासाहेब कोकरे यांनी गणेशच्या डोक्यात गजने वार करत त्याचा निर्घृणपणे खून केला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर धुमाळवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, माळेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत लालासाहेब कोकरे याला अटक केली आहे. त्याने खूनाची कबुली दिल्याची माहिती किरण अवचर यांनी दिली.