
बारामती : प्रतिनिधी
नवजात बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बारामती शहरातील शिवनंदन हॉस्पिटलच्या डॉ. तुषार गोविंद गदादे यांच्यावर बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसुतीवेळी अनुपस्थित राहिल्यामुळे संबंधित बालकाचा मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय समितीने दिला आहे. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी बारामती शहरातील शिवनंदन हॉस्पिटलमधील डॉ. तुषार गदादे यांच्याकडे प्रसूतीसाठी पद्मिनी गोपाळ गायकवाड या गर्भवती महिलेला दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. गदादे यांनी संबंधित महिलेची प्रसूती सिजेरियन पद्धतीने करावी लागेल असं सांगितलं आणि ते रुग्णालयातून निघून गेले. या दरम्यान या महिलेला प्रसूती कळा जाणवू लागल्या. त्यामुळे प्रसुतीची तयारीही करण्यात आली. परंतु चुकीच्या पद्धतीने प्रसूती केल्यामुळे संबंधित नवजात बालकाचा गुदमरून मृत्यू झाला. विशेष म्हणजे, प्रसूती करताना संबंधित डॉक्टरही हजर नव्हते. या सर्व घटनेमुळे संबंधित कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला. त्यांनी तातडीने बारामती शहर पोलिस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने त्रिसदस्यीय समिती नेमत चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. या समितीने आपला अहवाल दि. ३० ऑगस्ट रोजी सादर केला. त्यामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जी आणि निष्काळजीपणामुळे या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तपासणी करणारी परिचारिकाही आवश्यक शैक्षणिक आर्हताप्राप्त नव्हती असेही या चौकशीत समोर आले आहे. त्यावरून आता डॉ. तुषार गदादे यांच्यावर बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवाभाव गेला; व्यावसायिक दृष्टीकोन वाढला
बारामतीत मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्या आहेत. अनेक खासगी रुग्णालये सुरू झाली आहेत. परंतु या रुग्णालयात सेवाभाव उरलेला नाही. उलट व्यावसायिकता अधिक आली आहे. त्यातच बाळंतपणाशी संबंधित रुग्णालयांची तर स्पर्धाच सुरू झाली आहे. हजारो रुपये घेऊन सर्रास सीझर हा पर्याय देण्याची पद्धत वाढीस लागली आहे. त्यामुळे याला कुठेतरी लगाम लागला पाहिजे अशीही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त होत आहे.