बारामती : प्रतिनिधी
धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बारामतीत चंद्रकांत वाघमोडे यांनी ९ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र आरक्षणाच्या मागणीबाबत शासन स्तरावर दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दि. १६ नोव्हेंबर रोजी बारामती बंदची हाक देण्यात आली आहे.
धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात करावा या मागणीसाठी बारामती प्रशासकीय भवनासमोर ९ नोव्हेंबर रोजी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. चंद्रकांत वाघमोडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. परंतु शासन पातळीवर या आंदोलनाकडे प्रशासकीय पातळीवर दुर्लक्ष केले जात आहे. याच्या निषेधार्थ धनगर बांधवांनी उद्या बारामती बंदची हाक दिली आहे.
धनगर समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा बंद पाळला जाणार आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी सलग दोन दिवस या आंदोलनाला भेट देत मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला होता. या दरम्यान अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनीही आंदोलकांची भेट घेतली होती. प्रत्यक्षात प्रशासकीय पातळीवर कोणत्याच हालचाली होत नसल्याचे धनगर बांधवांनी म्हटले आहे.
येणाऱ्या काळात या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा या निमित्तानं देण्यात आला आहे. या बंद बाबत प्रशासन आणि पोलिस यंत्रणेलाही निवेदन देण्यात आले आहे. उपोषणकर्त्यांच्या मागणीला बळ देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला असून सनदशीरमार्गाने तो पार पाडणार असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.