बारामती : प्रतिनिधी
जालना येथील मराठा आंदोलकावरील झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. काटेवाडीकरांनी बारामती-इंदापूर रस्त्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करत या घटनेचा निषेध केला. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फुल्या मारलेले फोटो झळकवत राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची साथ सोडावी अशी मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. आज सकाळी बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बारामती-इंदापूर रस्ता रोखण्यात आला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमांवर फुली मारत राज्य शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
जालना येथे झालेल्या घटनेला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे दोघे जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचे काटेवाडी सोसायटीचे अध्यक्ष स्वप्नील काटे यांनी सांगितले. आम्ही अजितदादांना एकच विनंती करत आहोत, त्यांनी एक तर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची साथ सोडावी अशी काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने अजितदादांना विनंती केली आहे. अजितदादांकडे आम्ही खूप अपेक्षेने पाहत असल्याचेही स्वप्नील काटे यांनी यावेळी नमूद केले.
जालना येथील घटनेला सर्वस्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत. या ठिकाणी आंदोलनावर अमानुषपणे लाटी हल्ला करून जबर मारहाण करण्यात आली. लहान मुले, महिला यांना देखील सोडले नाही असे सांगून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे म्हणाले, आमचा पोलिसांवर रोष नाही. वरिष्ठांच्या आदेशाने हे कृत्य केले.मात्र त्यांना आदेश देणाऱ्या वरिष्ठांविषयी आमचा राग आहे. मागील सात वर्षांमध्ये मराठा समाजाने लाखोच्या संख्येने मोर्चे काढले मात्र कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
शांततेच्या मार्गाने सुरू असणारे हे आंदोलन दडपण्याचा सरकारने प्रयत्न का केला. कारण जालना येथे काही दिवसात शासन आपल्या दारी हा राज्य शासनाचा उपक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला अडचण नको म्हणून पोलिसी बळाचा वापर करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. येथील अनेक आंदोलकांवर तसेच युवक महिलांवर गुन्हे देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे हा सर्व प्रकार चीड आणणारा असून मराठा समाजाच्या भावना दुखवणार आहे त्यामुळे आम्ही हे आंदोलन केल्याचे अमोल काटे यांनी सांगितले.