
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींवर अखेर कारवाईला सुरूवात झाली आहे. बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाकडून अग्निशमन ना हरकत दाखल्याची पूर्तता न केलेल्या अकॅडमी सील करण्यात आल्या आहेत. पोलिस यंत्रणेचं सहकार्य घेत ही कारवाई सुरू करण्यात आली असून टप्प्याटप्प्याने सर्व अकॅडमींवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
बारामती शहर आणि परिसरात मागील काही वर्षात बेकायदेशीर अकॅडमींचा सुळसुळाट झाला आहे. कोणत्याही परवानगीशिवाय विद्यार्थ्यांची थेट फसवणूक या अकॅडमींकडून सुरू आहे. शासनाच्या कोणत्याच नियमांची पूर्तता न करता खुलेआम विद्यार्थी आणि पालकांच्या लुटीचा धंदाच या अकॅडमींकडून सुरू आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभाग अथवा संबंधित कोणत्याही विभागाने परवानगी दिलेली नसताना या अकॅडमींचा हैदोस सुरू आहे.
आपल्या अकॅडमीच्या गुणवत्तेच्या जाहिराती करून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये वसूल करून प्रवेश द्यायचा अशी पद्धत राबवली जात होती. प्रत्यक्षात मात्र या अकॅडमीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश बारामती, इंदापूर आणि अन्य परिसरातील शाळांमध्ये दाखवले गेल्याचेही समोर आले होते. याबाबत बारामतीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी उपोषण केले. त्यानंतर प्रशासनाने एकत्रित सर्व विभागांची बैठक घेऊन या अकॅडमींवर कारवाई करण्याचे धोरण निश्चित केले.
त्यानुसार बारामती शहरातील फायर ऑडिट नसलेल्या आणि अन्य बाबींची परवानगी नसलेल्या अकॅडमींवर कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय परिसरातील अकॅडमींवर आज बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने कारवाई केली. येथील अनेक अकॅडमी सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता बेकायदेशीर अकॅडमीचालकांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, प्रशासनाने या कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी होत आहे.