आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BARAMATI BIG BREAKING : बारामतीत सलग दुसऱ्या दिवशी घरफोडीचा प्रकार; सूर्यनगरीतील बंद सदनिका फोडून दागिने आणि रोख रक्कम अशी ७ ते ८ लाखांची चोरी

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहरातील घरफोडीचे प्रकार काही थांबायचं नाव घेत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काल मध्यरात्री दोन तासात १६ सदनिका फोडून तब्बल २५ टोळे सोने आणि काही रक्कम लांबवल्याचा प्रकार ताजा आहे. अशातच आज दुपारी सूर्यनगरी परिसरातील एका सदनिकेतून सोने आणि रोख रक्कम असा सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

बारामती शहरातील देसाई इस्टेट परिसरात काल एका कारमधून आलेल्या चोरट्यांनी १६ सदनिका फोडून २५ तोळे सोन्यासह काही रोख रक्कम लांबवली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच शहरातील सातव चौकामधील रम्यनगरी अपार्टमेंटमधील सदनिकेतून ६ लाख ४० हजार रुपये किमतीचे १६ तोळे सोने आणि ५० हजार रुपये रोख असा ६ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना समोर आली.
चरणसिंग चव्हाण यांनी याबाबत फिर्याद दिली असून ते बहिणीला भेटण्यासाठी गेलेले असताना हा प्रकार घडला. परतल्यानंतर घराच्या दारवाजाचा कडीकोयंडा तुटल्याचं दिसलं. त्यानंतर घरातील कपाटही उचकटलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी घराची तपासणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ बारामती शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कालचे हे प्रकार ताजे असतानाच आज दुपारी पुन्हा एक घरफोडीचा प्रकार समोर आला आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सूर्यनगरी येथील बंद सदनिका फोडून त्यामधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा जवळपास ७ ते ८ लाखांचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर बारामती तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, बारामती शहर आणि तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचवेळी पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बारामतीत पोलिसांचा वचक राहिला नाही का असाच प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us