बारामती : प्रतिनिधी
राष्ट्रीय मागासवर्ग (ओबीसी) मोर्चाच्या वतीने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी, जुनी पेन्शन योजना सुरु करावी, ईव्हीएमचा वापर मतदानासाठी होऊ नये, खाजगी क्षेत्रात एससी, एसटी, ओबीसींना आरक्षण लागू करावे, कामगार कायदा रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी बुधवार दि.२५ मे रोजी विविध संघटनांच्या वतीने भारत बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीतही बंद पाळण्यात येणार असून बारामती विविध संघटनांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाने बारामती बंदची हाक दिली असून तालुक्यातील कामगार,ओबीसी समाज आणि अन्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद मध्ये सामील व्हावे असे आवाहन भारत मुक्ती मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.सुशिल अहिवळे यांनी केले आहे. आता पर्यंत या बंद ला शेरसुहास मित्र मंडळ आणि मानव एकता युवक संघटनेचे संस्थापक माजी उपनगराध्यक्ष भारतदादा अहिवळे,ओबीसी समाज संघटनेचे पुणे जिल्हा युवाध्यक्ष माजी नगरसेवक अभिजित काळे, बारामती बागवान समाज संघटनेचे असिफ बागवान, सलीम बागवान, लोहार समाज संघटनेचे नितीन थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष रोहित बनकर, नाभिक संघटनेचे सुधाकर माने यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा व्यक्त केला आहे.
उद्या बुधवार दि.२५ मे रोजी ओबीसी मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला बारामती शहरातील सर्व व्यापारी वर्ग पूर्णपणे सहकार्य करणार असून उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत बारामती शहरातील सर्व दुकाने कडकडीत बंद राहतील अशी माहिती बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी दिली.