मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पित्ताशयावर झालेल्या शास्त्रक्रियेनंतर आज पुन्हा एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. नियमीत तपासणीदरम्यान त्यांच्या तोंडात अल्सर आढळून आल्याने तो काढण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रमुख प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
शरद पवार हे नियमीत तपासणीसाठी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी त्यांच्या तोंडात अल्सर असल्याचे आढळून आले. हा अल्सर छोटीशी शस्त्रक्रिया करून काढण्यात आला. शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून येत्या काही दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
शरद पवार हे सध्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात आहेत. तेथूनच ते कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. ज्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असेल, त्या नेत्यांना शरद पवार हे रुग्णालयातूनच मार्गदर्शन व सूचना करतील असेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.