बारामती : प्रतिनिधी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर करत रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर आज बारामतीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत पेढे वाटून आनंद साजरा केला. नव्याने आलेल्या राज्यपालांनी संविधान आणि महापुरुषांचा सन्मान ठेवून कार्यरत राहावे अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश बांदल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याचा अनोख्या पद्धतीने जल्लोष केला. बारामती एमआयडीसीतील पेन्सिल चौकात फटाके वाजवत राष्ट्रवादी युवकाच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटले. उशीरा का होईना केंद्र सरकारने महापुरुषांचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान करणाऱ्या राज्यपालांचा राजीनामा स्वीकारला. त्यामुळे आता नव्याने येणारे राज्यपाल चांगले काम करतील अशी अपेक्षा युवकाध्यक्ष अविनाश बांदल यांनी यावेळी व्यक्त केली.
राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे शहराध्यक्ष तुषार लोखंडे, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कावळे, आदित्य हिंगणे, सोमनाथ गायकवाड, पंकज मुटेकर, सुरज चौधर, नवनाथ चौधर, ओवेज बागवान, आकाश सूर्यवंशी, अण्णा पाटील, निलेश गवळी, लखन कांबळे, आकाश काळे, रोहित कांबळे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.