Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : पुणे विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

ह्याचा प्रसार करा

जेजूरी : प्रतिनिधी

पुणे विद्यापीठासह अन्य महाविद्यालयांची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी नीरा येथे धाड टाकत तिघांना ताब्यात घेत त्यांच्यावर जेजूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या या दमदार कामगिरीमुळे बनावट प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकांचा मोठा घोटाळा समोर आला आहे.

गणेश संपत जावळे (रा. नीरा), मनोज धुमाळ (रा. नीरा) आणि वैभव लोणकर (रा. बारामती) या तिघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इतर महाविद्यालयांची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवून त्यांची विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप येळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पुणे विद्यापीठाकडे याबाबत शहानिशा करून घेतली. त्यानंतर नीरा येथील समीक्षा प्रिंटिंग प्रेसमध्ये धाड टाकली असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले.

या प्रकरणी  गणेश जावळे, मनोज धुमाळ आणि वैभव लोणकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर जेजूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप येळे, पोलिस हवालदार रविराज कोकरे, अनिल काळे, सचिन घाडगे, पोलिस नाईक गुरू जाधव, अभिजित एकशिंगे,  स्वप्नील अहिवळे, अजय घुले, राजू मोमीन, पोलिस कॉन्स्टेबल प्रसन्ना घाडगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version