बारामती : प्रतिनिधी
राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर शनिवार दि. २६ ऑगस्ट रोजी अजित पवार हे प्रथमच बारामतीत येत आहेत. शनिवारी दुपारपासून अजितदादांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार असून सायंकाळी नागरी सत्काराचंही आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील राजकीय घडामोडीनंतर अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर प्रथमच अजितदादा येत्या शनिवारी दि. २६ ऑगस्ट रोजी बारामतीत येणार आहेत.
दुपारी अजित पवार यांचं बारामती तालुक्यात आगमन होणार आहे. अजितदादांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी बारामती शहरात भव्य मिरवणुकीने त्यांचे स्वागत केले जाणार असून शारदा प्रांगणात नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
तब्बल दोन महिन्यानंतर अजितदादा बारामतीत येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अजितदादा बारामतीकरांना काय गिफ्ट देतात याकडेच आता लक्ष लागले आहे.