बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील पाटस रस्त्यावरील कृष्णा पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापकाला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे.
सोन्या उर्फ अभिषेक दत्तात्रय गावडे (रा. मेडद, ता. बारामती) आणि अक्षय बाळू दहिंजे (रा. सटवाजीनगर, बारामती) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, सोमवारी बारामतीतील ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या कृष्णा पेट्रोलपंपवरील व्यवस्थापक मयूर बाळासाहेब शिंदे हे पंपावर जमा झालेली रोख रक्कम घेऊन बारामती सहकारी बँकेत निघाले होते. त्यावेळी त्यांच्यामागून स्प्लेंडर या दुचाकीवरून तोंडाला मास्क लावलेले दोन तरुण आले. त्यांनी शिंदे यांना अडवत त्यांच्याकडील १ लाख ९९ हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.
शिंदे हे प्रतिकार करत असल्यामुळे चिडलेल्या चोरट्यांनी त्यांच्याकडील पिस्तुलाच्या मुठीने शिंदे यांच्या डोक्यात मारहाण केली. मारहाण होत असतानाही शिंदे यांनी आपल्याकडील बॅग सोडली नाही. या दरम्यान, हा प्रकार पाहून रस्त्यात ये-जा करणारे वाहनचालक थांबू लागले. त्यामुळे या चोरट्यांनी बॅग त्याच ठिकाणी सोडून पाटस रस्त्याच्या दिशेने पळ काढला.
या घटनेनंतर बारामती शहर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तपास सुरू केला. त्यासाठी आसपासच्या पोलिस ठाण्यांचीही मदत घेण्यात आली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा मागमूस लागल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. सोन्या गावडे आणि अक्षय दहिंजे या दोघांकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र, वाहन व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या आरोपींचा आणखी एक साथीदार फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश तायडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे, प्रकाश वाघमारे, दिलीप पवार यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक अमित सिद पाटील, सहाय्यक फौजदार रवीराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, राजू मोमीन, सागर क्षीरसागर, अजित भुजबळ, विजय कांचन, अजय घुले, बाळासाहेब खडके, अतुल डेरे, गुरु जाधव, रामदास बाबर, काशिनाथ राजापुरे, शहर पोलिस ठाण्याचे अक्षय सिताफ, मनोज पवार, सागर जामदार, दशरथ इंगोले, यशवंत पवार, सचिन कोकणे यांनी ही कामगिरी केली.